प्रतिनिधी / विठ्ठल बक्कावाड
भोकर दि. ११- तालुक्यातील मौजे कांडली येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असुन गावातील तरुण व्यसनाधीन होऊन अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. गावात दारू विकण्याचा कसलाही प्रकारचा कायदेशीर परवाना त्यांच्या जवळ नसताना बेकायदेशीर मार्गाने सर्रासपणे देशी, विदेशी दारू, केमिकल युक्त सिंधी, रासायनिक दारू विक्री मोठ्या प्रमाणावर चालू आहे. या गावातील तरुण मोठ्या प्रमाणात या दारुच्या आहारी जाऊन बळी जात आहेत. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. दारूच्या नशेत अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. आई-वडिलांना मारहाण करीत आहेत. सायंकाळी गावात दारूच्या नशेत वादविवाद होत आहेत. गावातील सरपंच व लोक प्रतिनिधींना अरेरावी करत शिवीगाळ करत आहेत. कांडली गावात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या समोरच महिलांनी गावात होणार्या दारू विक्री विषयी माहिती दिली. तेंव्हा जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तेंव्हा पोलीसानी दारु विक्री बंद केली. पण पुन्हा अवैध दारू विक्रीने तोंंड वर काढले असून मागचीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कांडली गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तीन वेळेस या गावी पाय लाभले होते. त्यांच्या विचाराच्या संस्कारावर गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने निर्वेशाने राहत होते. ग्राम गीतेचे पठण असलेल्या या गावास अनेक पुरस्कार ग्राम स्वच्छता या माध्यमातून गावात मिळाले आहेत. कांडली गावातील सुख-समृद्धी व शांतता कायम ठेवण्यासाठी अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांना तात्काळ बंदोबस्त करून त्यांना हद्दपार करुन कारवाई करण्यात यावी. अन्यथा ऐन दिवाळीच्या सणात दि. १४ नोव्हेंबर २०२३ पासून कांडली गावातील हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा राष्ट्रीय कीर्तनकार गंगाधर भोजन्ना गिरोड यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती मे.पोलीस महानिरीक्षक, परिक्षेत्र नांदेड, मे. पोलीस अधीक्षक नांदेड, अप्पर पोलीस अधिक्षक भोकर,मे. उपविभागीय अधिकारी भोकर,मे. पोलीस निरीक्षक भोकर,मे. तहसीलदार भोकर,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांना देण्यात आले आहे.