प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सततच्या प्रयत्नाना अखेर यश ! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भोकर दि.८- नांदेड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र व पाणी उपलब्धता वाढविण्याच्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना आणखी एक मोठे यश मिळाले असून, भोकर तालुक्यातील पिंपळढव साठवण तलाव प्रकल्पासाठी ७३ कोटी ७६ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जलसंपदा विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयाबाबत अशोकराव चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला असून, महाविकास आघाडी सरकारच्या काळात नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक सिंचन प्रकल्पांबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पिंपळढव साठवण तलाव हा प्रकल्प गोदावरी खोऱ्यांतर्गत सुधा उपखोऱ्यामध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पामध्ये पिंपळढव येथे धरण बांधले जाणार आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता ५.८४७ दशलक्ष घनमीटर असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पिंपळढव, डौर, जामदरी, सिध्दार्थनगर ,वाडी, मातूळ, बल्लाळ, लगळूद व रावणगाव या गावांच्या परिसरातील ६६० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होईल.
या भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी व शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पाची आवश्यकता होती. त्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात २३ एप्रिल २०२२ रोजी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत पिंपळढव प्रकल्पासाठी ७३ कोटी ७६ लाख रूपयांचा अंदाजित खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकल्पासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे, यासाठीही चव्हाण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यातून पाणी उपलब्धता प्रमाणपत्रही मिळाले व या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. पिंपळढव प्रकल्पाला ७३ कोटी ७६ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाल्याने नागरिक व विशेषतः शेतकऱ्यांची जुनी मागणी पूर्ण झाली असून, त्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होते आहे.