प्रतिनिधी/ माली पाटील
• भोकर विधानसभा मतदारसंघातुन काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तिकिट देऊन निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्यास मी सर्व ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे नुकतेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले राष्ट्रीय गोरसेनेचे अध्यक्ष व बंजारा नेते अरुण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भोकर येथील शासकीय विश्रामगृहात अरुण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की,सर्व समाजासाठी दिवस रात्र काम करत असताना बंजारा समाजासाठी स्वतःची आयुष्य झिजविले आणि स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून अन्याय व अत्याचाराच्या विरोधामध्ये लढा देत आहे. जेव्हा जेव्हा बंजारा समाजावर अन्याय आणि अत्याचार होतो त्यावेळेस गोरसेनेचे माध्यमातून मैदानात उभे राहतो. तसेच समाजातील ऊसतोड कामगारांसाठी अनेक आंदोलने,मेळावे घेतले. दिन दलीत पिडीत लोकांच्या कल्याणासाठी गोरसेना अनेक वेळा रणसिंग फुंकले. व त्यांना शासनाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. अन्याय व अत्याचाराच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रखर लढा उभारले आहेत.त्यामुळे समाज सेवा करताना राजकारण ही महत्वाची असल्याने आणि यासाठी काँग्रेस पक्षच सर्वधर्मसमभावाला न्याय देते म्हणून मी व माझ्या गोरसेनेच्या हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा प्रचंड मोठा ताफा घेऊन दि.११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी रमेश रमेश चेनीथला, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री अमीत देशमुख यांच्या व काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्याचा उपस्थितीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस नेतृत्वाने दिलेल्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास असून काँग्रेस पक्षाचे तिकीट देऊन लढ म्हणटल्यावर मि ही निवडणूक सर्व ताकतीने लढणार असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा अध्यक्ष पवार, उपाध्यक्ष रमेश राठोड धावरीकर हे उपस्थित होते.